चळवळीतले अनुभव – थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे
प्रसंग लोकल वारीचा
वेळ रात्री१०-१५ ची
स्थानक- कांजूरमार्ग मुंबई
माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत कांजूरमार्ग ला दारा जवळ येऊन उभा राहिलो तर एक माणूस (अर्थात मराठी माणूस) मला हिंदीत विचारतो की ‘ ही गाडी थाना जाणार का? तर मी सरळ सांगितले की थाना कुठल्या ग्रहावर आहे माहीत नाही, पण ही गाडी ठाणे येथे जाणार मग तो गाडीत चढला आणि म्हणाला की (अर्थात आता मराठीत) मी मराठीतून बोलतोय म्हटल्यावर बोलू लागला की ठाणे आणि थाना एकच आहे, मी म्हटलं मला फक्त ठाणे माहीत आहे, थाना अस कुठलेही गाव महाराष्ट्रात नाही मग त्याची चूक त्याला लक्षात आली आणि मी उतरत असतांना मला म्हणाला की आता इथून पुढे मरेपर्यंत ठाणेच बोलणार, मला ही आनंद झाला आणि मी परत एक सल्ला दिला की दादा मराठीतूनच बोलत चला, ते ही त्याला पटले.
अनेकदा, आपल्या सभोवती अनेक लोक आपल्या महाराष्ट्रातील नावांचा अपभ्रंश करतात, कळवा ह्याचं कलवा, पुणे ह्याचं पूना, धुळे ह्याचं धुलिया, टिळक नगर ह्याचं तिलक नगर. तेव्हा आपण त्यांना समजवून सांगायचं. एखाद्याने आपलं नाव कोणी चुकीचं उच्चारलं कि त्याला आपण समज देतोच ना? तशी महाराष्ट्रभूमीतील हि नावं आपलीच आहेत. त्यांना जपणं हेही आपलं कर्तव्य आहे. आणि आपलं कर्तव्य आपण बजावायलाच हवं.
आपल्यालाही अशी लोकं पदोपदी भेटतच राहणार आपण मात्र मराठीतच बोलायचं, आपण जर परभाषेत बोललो तर मराठी कशी वाढेल? मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी इथे बिनधास्त मराठी बोला!!
– पुरुषोत्तम इंदानी