रेल्वे प्रवासातला एक लहानसा, साधासा पण सुखद अनुभव.

अनुभव 108

#मराठीबोलाचळवळ #अनुभव #मराठीबाणा

काल मी सायंकाळी मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्स्प्रेसने पनवेलहून चिपळूणला आलो. मी S-1 या स्लीपर कोच मध्ये होतो. माझ्या शेजारी एक हिंदीभाषिक जोडपं होतं. व एक साधारण 55 वर्षे वयाचे मूळचे होन्नावर (कर्नाटक) येथील मुंबईस्थित गृहस्थ होते.सामानाची लावालाव होऊन दहा-पंधरा मिनिटांनी गाडीत ‘सेटल’ झाल्यानंतर हळूहळू आमच्या गप्पांना सुरूवात झाली.

हिंदी जोडप्यातल्या नवर्‍याने मला “आप कहाँ जानेवाले हो ?” असा प्रश्न केला. त्यावर मी “चिपळूणला” असं उत्तर दिलं. आणि त्यानंतर त्याला “तुम्ही कुणीकडे चाललात” असं विचारलं. तसं तो “लास्ट स्टाॅप” असं म्हणाला.

त्याने मला हिंदीत प्रश्न विचारूनही मी त्या प्रश्नाचं उत्तर मराठीत दिलं व तोच प्रश्न त्याला मराठीतूनच विचारला आणि त्याला तो कळल्यामुळे त्यानेही त्याचं उत्तर दिलं ही बाब एव्हाना त्या 55 वर्षीय कन्नड गृहस्थाच्या लक्षात आल्याने त्याने गप्पांना सुरूवात केली तीच मुळी मराठीत…
नंतर आम्ही एकमेकांची चौकशी केली. ते कन्नड गृहस्थ गेली दहा वर्षे मुंबईत स्थायिक झालेले असल्याने त्यांना चांगलं मराठी बोलता येत होतं. शिवाय नंतर तो हिंदीभाषिक माणूसही अस्खलित मराठी बोलायला लागला.. संध्याकाळी साडेचार ते रात्री नऊ हे साडेपाच तास आम्ही तिघांनी मिळून जबरदस्त गप्पा मारल्या. त्या कन्नड गृहस्थाकडून मीही कर्नाटकी भाषा, कोंकणी व मंगळूरी भाषा यातलं साम्य व फरक यांची थोडीफार माहिती घेतली. या साडेचार तासांच्या प्रवासात आमच्या गप्पा ऐकणार्‍या कुणालाही हे खरं वाटलं नसतं की या तिघांपैकी फक्त एक व्यक्ती मराठी आहे व बाकीच्या अमराठी आहेत…
आम्ही अगदी मोबाईलवर एकत्र सापशिडीचा गेमही खेळलो. हास्यविनोद केले.. मी माझी भाषा न सोडल्यामुळे ते दुखावले गेले नाहीत किंवा त्यांच्या विषयी माझ्या मनात सुद्धा कसलीही कटूता आली नाही..

सगळ्यात आधी मीच उतरणार होतो त्यामुळे चिपळूण आल्यावर उतरताना त्यांना “नमस्कार, येतो आता, मराठीतून बोलल्याबद्दल खूप आभार” असं म्हटलं तसं त्यांनीही “ओके मित्रा, भेटू असंच परत” असा दुजोरा दिला.

मी यात माझा मातृभाषाभिमान जपताना कुठे देश तोडला का ?
नक्कीच नाही…

गरज असते ती फक्त आपणहून आपल्या प्रांतात आपल्या भाषेसाठी आग्रही राहण्याची…
महाराष्ट्रात मराठी भाषा मराठी माणसांनी नाही जपायची तर मग कुणी जपायची आणि कुठे जपायची ??


—- योगेश यशवंत काटदरे.
mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: