मराठीवर अदृश्य भाषिक आक्रमण?

चळवळ मराठीची गळचेपी 151
marathi_aakramana

आक्रमण खरोखरीच होतंय?

आपल्यावर अदृश्य भाषिक आक्रमण किती होतंय याची आपल्याला कल्पनाही नाही. मराठी माणूस हिंदीच्या नको तितका आहारी गेल्याने ती भाषा महाराष्ट्रात झपाट्याने हातपाय पसरत आहे. महाराष्ट्रात सगळीकडे सतत दिसणाऱ्या हिंदी जाहिराती, अनेक उद्योगसमूहांनी मराठीतून सेवा न पुरवणं, मराठीतून माहिती न देणं हे या अदृश्य आक्रमणाचं दृश्य स्वरूप आहे. एकीकडे हिंदी चित्रपट, हिंदी मालिका, हिंदी भाषेतून डब होणारे हॉलीवूडचे आणि दाक्षिणात्य भाषांतले चित्रपट यांनी महाराष्ट्रात थैमान घातलं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रभाषा प्रचार संस्था, वेगवेगळ्या प्रादेशिक हिंदी साहित्य परिषदा आणि अश्या अनेक उपऱ्या संस्था महाराष्ट्रात बोकाळल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांत विनाकारण हिंदी विभाग स्थापन होऊन तिथे हिंदीचा प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर स्तरावर बिनदिक्कतपणे हिंदी भाषेतली पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहेत. मराठीसाठीच्या शासकीय प्रकाशन संस्था, ग्रंथालयं वगैरे घेतली तर तिथेही हिंदी ठाण मांडून बसली आहे. (भिलारला सुरु झालेल्या पुस्तकांच्या गावात तातडीने हिंदी पुस्तकं उपलब्ध करून देणं हे याच रोगाचं लक्षण आहे.) आणि इतकं सगळं कमी पडलं म्हणून की काय हिंदी भाषेचं केंद्रीय विद्यापीठही महाराष्ट्रात वर्ध्यामध्ये आहे. हिंदी भाषिकांच्या दादागिरीच्या जोरावर हिंदीला महाराष्ट्राची दुसरी अधिकृत भाषा करा अशी मागणी कधीही केली जाऊ शकते.

एकीकडे हिंदी चित्रपट, हिंदी मालिका, हिंदी भाषेतून डब होणारे हॉलीवूडचे आणि दाक्षिणात्य भाषांतले चित्रपट यांनी महाराष्ट्रात थैमान घातलं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रभाषा प्रचार संस्था, वेगवेगळ्या प्रादेशिक हिंदी साहित्य परिषदा आणि अश्या अनेक उपऱ्या संस्था महाराष्ट्रात बोकाळल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांत विनाकारण हिंदी विभाग स्थापन होऊन तिथे हिंदीचा प्रचार सुरु आहे

कारण आपणच?

हे आक्रमण अतिशय भयाण आहे. या आक्रमणाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण मुख्य कारण म्हणजे आपलं विरोध न करणं आणि हिंदीचं आक्रमण होतंय हे स्वीकारण्याबाबतची आपली अनास्था. हे आक्रमण पुढील काळातही अशाचप्रकारे, कदाचित याहीपेक्षा जास्त वेगाने व प्रखरतेने होऊ शकते कारण या सगळ्या आक्रमणाला तोंड देऊ शकेल असा मराठी भाषेचा एकमेव आधारस्तंभ जो की मराठी माणूस तो मात्र मस्तपैकी हिंदी चित्रपट पाहण्यात, हिंदी गाणी ऐकण्यात रममाण आहे. ‘बोललं थोडं हिंदी तर काय होतं?’ हा त्याचा मूलभूत प्रश्न आहे. ‘समोरच्याला मराठी कळत नसेल तर मी मराठीत का बोलत राहावं?’ असे त्याचे आदर्श विचार आहेत. मराठी बोलताना हिंदी शब्द वापरणं, मराठी शब्दांचं हिंदीकरण करणं, अफाट शेरोशायरी करणं हे त्याला जडलेले राजेशाही छंद आहेत. ‘हिंदी ही मराठीपेक्षाही काकणभर श्रेष्ठ आहे’ अशी त्याची ठाम धारणा आहे आणि इंग्रजीमुळेच मराठी रसातळाला जातीये अशी त्याची प्रामाणिक समजूत आहे. मराठी माणूस स्वतःच्या शिक्षणापासून ते स्वतःच्या स्वाक्षरीपर्यंत सर्व काही इंग्रजीत करतो, तरीही ‘इंग्रजी ही परक्याची भाषा आणि हिंदी ही आपली भाषा आहे’ असं म्हणून इंग्रजीला शिव्या देतो. हिंदीला मात्र राष्ट्रभाषा, संपर्कभाषा असल्या घटनाविरोधी नावांनी संबोधून हिंदीचं कोडकौतुक करतो आणि खुशाल हिंदीचं मराठीवर आक्रमण होऊ देतो. आज जगामध्ये सर्वत्र इंग्रजी भाषा स्वीकारली जातीये हे सोयीस्करपणे विसरून मराठी माणूस इंग्रजीचा आंधळा विरोध करतो आणि जी सर्वार्थाने निरुपयोगी आहे अश्या हिंदीचा मात्र प्राणपणाने पुरस्कार करतो. महाराष्ट्रात इंग्रजी कितीही पसरली तरीही ती रस्त्यावरची, खेड्यापाड्यातली आणि सामान्य माणसांच्या व्यवहारांची भाषा होऊ शकत नाही. हिंदीने मात्र महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातही शिरकाव केला आहे. महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता हॉलीवूडचे चित्रपटही इंग्रजीत न पाहता हिंदीत पाहते ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मराठीवर होणारे खरे आक्रमण कुठल्या भाषेचे आहे हे कळेल. मराठी जनता इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीकडे वळत आहे आणि इंग्रजीला हिंदी हा समर्थ पर्याय आहे असं मानणं हे निव्वळ हास्यास्पद आहे.

निर्माण झालेली समस्या आणि त्यावरील तोडगा

महाराष्ट्रातली आर्थिक प्रगती, साक्षरता आणि मराठी माणसाची हिंदीकडे सहजतेने वळण्याची मानसिकता यामुळे महाराष्ट्र ही हिंदी भाषेची उत्तरभारतापेक्षाही मोठी व्यापारपेठ बनली आहे. परिणामी महाराष्ट्रातून मराठी ही व्यवहाराच्या, व्यापाराच्या आणि करमणुकीच्या क्षेत्रात वाढू शकत नाहीये. त्याचा परिणाम मराठीच्या व्यावसायिक मूल्यावर होत आहे. आज महाराष्ट्रात वावरताना अनेकदा ‘आम्हाला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला’ अशी जी माजुरडी उत्तरं आपल्याला मिळतात ते आपल्या हिंदी स्वीकरण्याचंच फळ आहे. आणि तरीही हिंदीविरुद्ध काहीही ऐकलं की मराठी माणूस आपली मातृभाषा असल्याप्रमाणे हिंदीची वकिली करतो. आपली आई मेली तरी चालेल पण ही मावशी मात्र जगली पाहिजे असा मराठी माणसाचा ताठ बाणा आहे. मराठीपुढील हिंदीच्या या ज्वलंत आव्हानाकडे आपण डोळे उघडून कधी पाहणार आहोत? रोजरोज मराठीसमोर हिंदीमुळे उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांना आपण तोंड कसं देणार आहोत? आपली २००० वर्षांची समृद्ध परंपरा असलेली प्राचीन मातृभाषा फक्त एक घरात बोलली जाणारी बोलीभाषा म्हणून आपण शिल्लक ठेवणार आहोत का? तशी आजवर मराठीने अनेक परकीय आक्रमणं खंबीरपणे पचवली आहेत, पण हे आक्रमण स्वकीयांचं आहे आणि म्हणून ते अधिकच दुःसह आहे. त्याचे स्वरूप, त्याचे गांभीर्य आणि त्याचे परिणाम आपण लवकरात लवकर ओळखायला हवेत. आपली हिंदी बोलण्याची, हिंदी वापरण्याची, हिंदी ऐकण्या-पाहण्याची सवय आपल्या मातृभाषेच्या दृष्टीने मारक आहे याची खूणगाठ आपण आपल्या मनाशी बांधली पाहिजे. मराठी करमणुकीला प्राधान्य देणं आणि सर्व ठिकाणी, सर्व क्षेत्रात मराठीची मागणी करणं हे प्रामुख्याने केलं पाहिजे.

#मराठीबोलाचळवळ

© अथर्व पिंगळे

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: