मराठी भाषेच्या पराभवाची कारणे

चळवळ महाराष्ट्र विशेष लेख 65

मराठी भाषा माघारत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठी लोकांची ‘दैनंदिन जीवनात स्वतःची भाषा सोडून इतर भाषांचा वापर करण्याची सवय!’ आहे. या सवयीमुळे मराठीची किती व कशाप्रकारे हानी होते आहे याची चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे –

मराठी समाजाचा स्वभाषेविषयीच्या कमीपणाचा भाव इतक्या पराकोटीला पोहोचलेला असतो की सोबत एक अमराठी व्यक्ती असेल तर त्याला आपलं बोलणं समजावं म्हणून दहा मराठी लोक एकमेकांत हिंदी बोलतात! कॉलेजांतील मराठी विद्यार्थ्यांना अमराठी शिक्षकांशी मराठी बोलण्याचं धाडस होत नाही; अमराठी विद्यार्थ्यांशी मराठीत बोलावं असा विचारही मनाला शिवत नाही. मराठी शिक्षकांनाही वर्गात अमराठी विद्यार्थी असतील तर मराठी बोलताना बिचकल्यासारखं होतं. आपल्याच राज्यात आपली भाषा बोलणं हे काहीतरी अपराध असल्यासारखं भासायला लागतं. अमराठी व्यक्तींशी मराठी बोलण्याची गरज वाटत नाही; उलट ‘त्यांना मराठी येत नाही, तर आपण त्यांच्याशी उगाच मराठी बोलण्याची गरज काय?’ असे दिव्य विचार मनात असतात! आपण नेहमी दुसऱ्याची भाषिक सोय पाहतो. उपहारगृहात गेल्यावर तिथल्या वेटर्सशी किंवा इतर कर्मचाऱ्यांशी मराठीत न बोलण्याचा आपला शिरस्ता असतो! पिझ्झा हट्, डॉमिनोजसारख्या आंतरराष्ट्रीय नाममुद्रा असलेल्या उपहारगृहांत तर मराठी न बोलण्याचा पण केल्याप्रमाणे आपण वागत असतो. अमराठी डॉक्टरांशी मराठी बोलायचा आपल्याला धीर होत नाही. मोठाल्या रुग्णालयांत तिथल्या कर्मचाऱ्यांशी मराठी न बोलण्याची आपल्याला सवय झालेली असते. रुग्णालयांतल्या हिंदी सूचना पाहून ‘इथे मराठी का वापरली नसावी?’ असले ‘क्षुल्लक’ प्रश्न कुणाही मराठी माणसाला पडत नाहीत! मोठ्या समारंभांत गेल्यावर आपल्याला मराठी बोलण्याची लाज वाटते. तथाकथित चकचकीत व उच्चभ्रू वस्त्यांतून फिरताना मराठी बोलणे गावंढळपणाचे वाटते. थोडक्यात अशा सर्व ठिकाणी आपण मराठी टाळतो. तीही स्वखुशीने. बरं, मराठी टाळून आपण इंग्रजी बोलतो की फ्रेंच की स्पॅनिश? उत्तर सोपं आहे. आपण हिंदी बोलतो! त्यामुळे मराठी व्यवहारातून बाद होत असेल तर ती इंग्रजी वगैरेंमुळे न होता हिंदीमुळे होते आहे. आणि हे आपण मान्य करण्याची वेळ आलेली आहे

.

मराठी जनतेने हिंदी स्वीकारल्यामुळे जाहिरातदार मराठीतून जाहिराती देत नाहीत. मोठ्या शहरांत अनेक ठिकाणी दुकानांवरच्या पाट्या हिंदीत लागलेल्या असतात. वस्तूंच्या आणि उत्पादनांच्या माहितीविषयीचे, त्यासंबंधींच्या सूचनांचे किंवा अटींचे फलक हिंदीतून असतात. हिंदी फलक लावल्याबद्दल आपण कुणालाही जाब विचारत नाही. मुळात आपल्याला हिंदीत काही वावगं वाटतच नाही! हिंदीच्या अशा सढळ वापरामुळे मराठी समाजाची व्यवहारभाषा हिंदी होत आहे, आपल्या शहरांचं हिंदीकरण होत आहे हे कुणाच्याही लक्षात येत नाही. या हिंदीकरणासाठी अमराठी व्यावसायिक आणि दुकानदार बऱ्याच प्रमाणात कारणीभूत असले तरी मुख्य दोष हा त्यांच्याशी मराठी न बोलणाऱ्या, त्यांना मराठी वापरायला न लावणाऱ्या मराठी ग्राहकांचा म्हणजेच पर्यायाने मराठी जनतेचा आहे! केवळ देवनागरीतून नाव लिहिलं म्हणजे मराठी होत नाही. दुकानातल्या सर्व सूचना, माहिती मराठीत लिहिली गेली पाहिजे. कायद्याचा दपटशा दाखवून हे काही प्रमाणात करता येईलही पण मुख्यतः मराठी ग्राहक मराठीतून बोलत नसतील तर कुठल्या दुकानदाराला मराठीतून पाट्या लावण्याची किंवा मराठी वापरण्याची गरज वाटेल? मराठी भाषिकांच्या औदासीन्यामुळे कुणी व्यावसायिक किंवा उद्योजक मराठीत फारशी गुंतवणूक करत नाहीत. मराठी व्यापाऱ्यांना व दुकानदारांनाही अमराठी भाषा वापराव्याशा वाटतात. मराठी लोकांचा भाषाविषयक न्यूनगंड सहाजिकच मराठी व्यावसायिकांच्या वृत्तीतूनही प्रकट होतो! काहीही गरज नसताना आपले व्यावसायिक आणि उद्योजक अमराठी ग्राहक आकर्षित करण्यासाठी मराठीला डावलून हिंदी आणि तत्सम अमराठी भाषांत पाट्या लावण्याचे केविलवाणे प्रकार करतात! भाषा ही प्रामुख्याने व्यवहारातून वाढते, उद्योगांतून वाढते. परभाषिकांचे लक्ष वेधण्यासाठी असो किंवा स्वतःची भाषा हिंदीपुढे कमी दर्जाची वाटते म्हणून असो, आपल्याकडूनच मराठी डावलली जाते आणि मराठीचे व्यवहारांतील स्थान हिंदीला मिळते. यामुळे मराठीची वाढ होत नाही.

मोठ्या शहरात येणाऱ्या अनुभवांपैकी काही अतिशय सामान्य अनुभव म्हणजे मोठ्या दुकानांत, मॉलमध्ये वगैरे गेल्यावर हिंदीत बोलणे. चष्म्याची, औषधांची किंवा वाणसामानाची दुकाने असली तरी मराठी माणूस न्यूनगंडापोटी सरळ हिंदी बोलू लागतो. अगदी प्राथमिक स्तरावर ही परीस्थिती असल्यामुळे पुढच्या सर्व पातळ्यांवर तर आनंदीआनंद आहे! व्यवहाराच्या, देवघेवीच्या सर्व ठिकाणी आपण मराठी ही निरुपयोगी भाषा ठरवून टाकली आहे. त्यामुळे मोठ्या दुकानांतून किंवा इंटरनेटवरून घरपोच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून ऑर्डरसंबंधी विचारणा करायची झाली की संबंधित प्रतिनिधी हा ग्राहक मराठी आहे हे माहित असलं तरी हिंदी बोलायला लागतो. मराठी प्रतिनिधीही मराठी ग्राहकाशी मराठी बोलताना कचरतो. मराठीतून सेवा पुरवल्या जात नाहीत. हे सर्व आपल्या मराठी बोलण्याविषयी वाटणाऱ्या न्यूनगंडातून उद्भवणारे प्रकार आहेत. विविध सेवा पुरवणाऱ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना सहसा कुठल्याही भाषेची बळजबरी करता येत नाही काही कारण ती तशी केली तर त्याचा थेट परिणाम या कंपन्यांच्या गुणांकनावर होतो. तेव्हा खासगी सेवा पुरवठादारांकडून ग्राहक मागणी करेल त्या भाषेतून सोयी पुरवल्या जातात. मराठी माणूस आपल्या भाषेची मागणी करत नाही, परिणामी मराठीऐवजी हिंदी रूढ होत जाते. आपल्या हिंदी बोलण्याच्या सवयीतून मराठीची सगळी बाजारपेठ आपण हिंदीला देत आहोत.

वैयक्तिक बोलाचालीतही आपण राजरोसपणे हिंदी वापरतो. मराठी आपल्याला का कोण जाणे पण सतत नीरस वाटत राहते, त्यामुळे आपण हिंदी माध्यमांच्या आश्रयाला जातो. हिंदी चित्रपट बघणे व गाणी ऐकणे हा तर नित्यक्रमच आहे पण जोडीला हिंदी बातम्या, शायरी, काहीही अर्थ नसलेले (बहुतेक मराठी लोकांनीच लिहिलेले) गचाळ धाटणीचे वेगवेगळ्या विषयांवरील हिंदी संदेश यांद्वारे आपण रोजच्या आयुष्यात हिंदीला शिरकाव करून दिला आहे. आपल्या हिंदीप्रेमी सवयीमुळे कविता, विनोद, ताज्या घडामोडींवरचे चटकदार संदेश अशा आपल्या आवडीच्या गोष्टी एकतर मराठीत तयार होत नाहीत किंवा तयार झालेल्या असल्या तरी हिंदीला प्राधान्यक्रम मिळत असल्यामुळे मागे पडतात. आपण मराठी लोक बरेचदा एकमेकांशीही हिंदीत बोलून जातो. ‘अरे भाई क्या मस्त दिखरा’, ‘गजब लगता है’, ‘शेर है मेरा भाई’, ‘क्या जच रहा है भाऊ’ अशा धेडगुजरी भाषेत एकमेकांचं कौतुक करतो. मित्रमैत्रिणींच्या फेसबुकवरील पोस्टींवर, इंस्टाग्रामवरील फोटोंवर हिंदीत प्रतिक्रिया देण्यात मराठी लोकांना धन्यता वाटते. एकमेकांचं क्षेमकुशल विचारण्यासाठी, खुशाली जाणून घेण्यासाठी परक्या भाषेचा आश्रय घ्यावा लागतो ही अभिमानास्पद गोष्ट आहे का लाजिरवाणी? ‘भावा, कुठे आहेस?’ असं विचारण्याऐवजी ‘किधर है भाई आजकल?’ असं विचारून नक्की काय साधलं जातं? बढिया म्हणण्याऐवजी ‘कडक’ किंवा ‘झकास’ म्हटलं तर मित्राच्या पोस्टचं सौंदर्य कमी होतं, का आपली पत कमी होते? समाजमाध्यमांवरील युट्युब आणि इतर संकेतस्थळांवर उपलब्ध असलेले मराठी चित्रपट, नाटकं, गाणी, बातम्या आणि विविध विषयांवरील दृश्यफिती यांवर कित्येक मराठी लोक हिंदीत प्रतिक्रिया नोंदवतात, हिंदी टिप्पण्या देतात. आपल्याला व्यक्त होण्यासाठी जर मातृभाषा रुचत नसेल तर आपण आपली मातृभाषा गमावण्यापाशी येऊन ठेपलो आहोत असं समजायला हरकत नाही. कुठलीही चांगली कलाकृती पाहिली, ऐकली की तोंडातून लगेच ‘वाह! क्या बात है’ आपसूक बाहेर पडतं. आपल्या भाषेतून दाद देता येत नसेल, साधे कौतुकाचे दोन-चार शब्द बोलता येत नसतील तर आपण आपल्या भाषेची केवढी दुर्दशा चालवली आहे हे लक्षात येईल. इथेही ‘इंग्रजीला बोल लावण्याऐवजी हिंदीला का धोपटता?’ असं कुणी म्हणतील. त्यांना सांगणं इतकंच की इंग्रजीच्या नको तितकं आहारी जाण्याची सवय ही वाईट आणि लाजिरवाणी आहेच! दुमतच नाही. पण तुलनात्मकरित्या पाहिल्यास मराठी समाज हिंदीच्या अधिक आहारी गेलाय की इंग्रजीच्या हे सहज जाणवेल. इंग्रजी चित्रपट म्हटले तरी बहुतांश मराठी लोकं त्यांची हिंदीत डब केलेली आवृत्ती पहायला जातात. मराठी लोकांना हिंदीची सवय अधिक आहे की इंग्रजीची हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत उदाहरण पुरेसं बोलकं आहे. मराठीवर आधीच इंग्रजीचं आक्रमण होत असताना आता त्यात हिंदीचीही भर पडली आहे. हिंदी आणि मराठी या सारख्या जातकुळीच्या भाषा असल्याने मराठीवर हिंदीचं आक्रमण होणं फार सोपं आहे, शिवाय ते पटकन जाणवण्यासारखंही नाही. त्यातही इंग्रजीच्या आक्रमणाविषयी नेहमीच बोलण्यात येतं पण हिंदीच्या आक्रमणाविषयी मुद्दे मांडण्याचं टाळलं जातं. म्हणून हा लेखनप्रपंच!

हिंदीच्या आक्रमणाचं शेवटचं टोक म्हणजे मराठी माणूस मराठी माणसापासून दुरावतो. ही दुरावण्याची प्रक्रिया मुख्यत्वे मोठ्या शहरांत प्रकर्षाने जाणवते. अशा मोठ्या शहरांत बरेचदा मराठी लोकं घराबाहेर पडली की आजूबाजूच्या कुणालाही मराठी येत नाही असं गृहीत धरून जिथेतिथे हिंदी बोलत राहतात. रिक्षावाल्याशी हिंदी, बसमध्ये हिंदी; साधी कुणाला वेळ विचारायची असली तरी हिंदी! एखादा अनोळखी मराठी माणूस कुणाला भेटला की जे सांगायचं असेल ते पहिल्यांदा हिंदीत सुरु करतो आणि काहीवेळा तर समोरचा माणूस मराठी आहे हे कळाल्यानंतरही हिंदीतच बोलत राहतो. एखादा तिऱ्हाईत पत्ता विचारण्यासाठी आला की सरळ हिंदीत विचारू लागतो. दोन वाटसरू चालताना एकाचा दुसऱ्याला धक्का लागला तरी पुढचा संवाद लगेच हिंदीतून चालू होतो. गर्दीच्या ठिकाणी तर हिंदीतून ओरडायचा परिपाठच झाला आहे. आताशा भांडणं करतानाही लगेच हिंदीचा वापर केला जातो. कदाचित हिंदीतून दमदाटी केल्यावर, हिंदीत शिव्या हसडल्यावर भांडणाला फारच भारदस्तपणा येतो अशा काहीशा समजुती मराठी लोकांत पसरल्या असाव्यात. आणि असल्या समजुती या केवळ स्वभाषेविषयी वाटणाऱ्या कमीपणातूनच निर्माण होतात. साध्यासाध्या गोष्टींसाठी आपल्याला आपली भाषा आठवत नाही हे केवढं दुर्दैव! सध्याच्या बहुतांश नोकरपेशा लोकांना हिंदीची प्रचंड सवय झाली आहे. खासगी क्षेत्रांतील अनेक ठिकाणी कार्यालयातल्या झाडूवाल्यापासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांशी हिंदीत संवाद चालू असतो. त्यामुळे जागोजागच्या वेगवेगळ्या कार्यालयांत आणि कचेऱ्यांतही व्यवहाराची भाषा बरेचदा हिंदीच झालेली असते. थोडक्यात आपल्या रोजच्या आयुष्यात आपण हिंदीला मुक्त प्रवेश दिलेला आहे. मराठी समाजात, जगण्याच्या विविध स्तरांवर हिंदी पसरलेली दिसेल. या सगळ्याचा परिपाक म्हणजे मराठी ही फक्त घरगुती वापरापुरतीच मर्यादित होत आहे आणि रस्त्यावर बोलल्या जाणाऱ्या भाषेची, विनिमयाच्या भाषेची जागा हिंदी घेत आहे. मराठी वाचवण्याच्या मोठमोठ्या वल्गना करणारे बहुतेक सगळे महाभाग रोजच्या आयुष्यात हिंदीचा प्रच्छन्नपणे वापर करत असतात. ज्या मराठीला आपण व्यवहारातून सातत्याने मागे पाडत आहोत ती केवळ शासकीय निधी मिळवणे, अनुदाने दिली जाणे असल्या वरवरच्या उपायांनी बळकट होईल का हे तपासण्याची गरज आहे. अगदी मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या कितीही वाढली; तरी हे प्रविष्ट विद्यार्थी जर बाहेरच्या जगात वावरताना मराठीऐवजी हिंदीत बोलणार असतील तर नक्की चुकतंय कुठं हे आपलं आपण ठरवावं.

#मराठीबोलाचळवळ

– अथर्व पिंगळे

 

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

डिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत!
डिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत! सर्वांसाठी एक आनंदाची बातमी! आता डिस्कव्हरी वाहिनी देखील मायबोली मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे!ऑगस्ट महिन्य...
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे!
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! काही लोक भाषेची व्याख्या ही भाषा म्हणजे केवळ एक संवादाचं माध्यम आहे अशी करतात. माझ्या मते ही व्याख...
बेळगाव सीमाप्रश्न - कणा मोडलेला महाराष्ट्र...  
पुन्हा १७ जानेवारीचा दिवस उजाडणार आणि पुन्हा सीमावासीयांची भळभळती जखम उघडी होणार. संयुक्त महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने पहिले रक्त सांडले गेले ते...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: