मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभराट व्हावी म्हणून प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. मराठी माणसाने स्वतःच बाजारमूल्य लवकरात लवकर ओळखावे.कोणताही न्यूनगंड न बाळगता सुईपासून ते सोनं खरेदी करताना मराठीतूनच व्यवहार करावे तरच आपली मायबोली वाढू शकते
मी जेव्हा नवीन व्यवसाय सुरू केला त्यावेळी बाजारातून खूप छोट्याप्रमाणात माल घेऊन मी विकत होतो त्याच कामासाठी मला AA , D आकाराची बॅटरी(CELL) लागत होती. ह्या बॅटरीचं वजन खूप जास्त असल्यामुळे घरपोच माल कोणी पाठवेल का असा पुरवठादार (supplier) मी शोधत होतो त्यानुसार एक सिंधी पुरवठादार माझ्या संपर्कात आले आणि आमच्या व्यापाराला सुरवात झाली. पण माझ्या नियमानुसार जेव्हा माझ्या खिशातून पैसे जातात तेव्हा तो व्यवहार मराठीतूनच व्हावा यासाठी मी नेहमीच आग्रही असतो.पण इथे उलट झालं व्यवहाराची बोलणी होत असताना त्या सिंधी गृहस्थाने सरळ माझ्या तोंडावरच मला सांगून टाकलं की मला मराठी येत नाही त्यामुळे तू हिंदीतून बोल. जमेल तसं तोडक्यामोडक्या हिंदीत मी ती व्यवहाराची बोलणी पूर्ण केली. एकदा मनात आलं त्याला बोलून टाकावं की मला हा व्यवहार करायचा नाही पण इतका कमी माल घरापर्यंत पोहचवणारा कोणी भेटेल की नाही हा सुद्धा प्रश्न होता.
थोडं थोडं भांडवल उभं करून माझ्या व्यवसायाला सुरवात झाली. मुंबईत काम वाढत गेलं काही दिवसांनी पुण्यातही चांगल्या ऑर्डर्स काढल्या. आता मालाची मागणी जास्त होती त्यामुळे लागण्याऱ्या batteries ची संख्या वाढत होती. सिंधी पुरवठादाराला त्याचे पैसे वेळच्या वेळेवर मिळत होते त्यामुळे तोही वेळेत बॅटरी आणून देत होता.जेव्हा जेव्हा तो सिंधी माझ्या घरी बॅटरी आणून देत तेव्हा तेव्हा तो मला विचारायचा की, इतका माल घेऊन तुम्ही करता तरी काय? मला कामासाठी लागतात अशी उत्तर मी त्याला द्यायचो.
यातच काही वर्षे निघून गेली हातातून माल घेऊन येणार सिंधी आता त्याच्या दुचाकीवर माल द्याला याला लागला.पुन्हा त्याने मला तोच प्रश्न केला तुम्ही करता तरी काय. आणि माझं उत्तर ठरलेलं. पण ह्यावेळी बोलताबोलता सिंधी काका बोलुन गेले की तुम्हीच आमचे मोठे ग्राहक आहेत. तुमच्या इतका माल आमच्याकडून कोणीच घेत नाही.
बस….
एक मोठा श्वास घेतला. आत्मविश्वास गगनाला भिडला. हेच पाहिजे होत मला. भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या स्वतःशीच बोललो आता माझा दिवस आहे. मनात आलं त्याला बोलून दाखवावं पण त्याने मला पाहिजे ते साध्य होणार नव्हतं माझी अपेक्षा होती की, त्यांनी नाईलाजाने माझ्याशी मराठीत बोलू नये तर आमचा व्यापार आनंदाने मराठीतून व्हावा. काही दिवस जाऊ दिले त्याला विश्वासात घेऊन त्याला मराठीतून व्यवहार, त्याच महत्व पटवून दिलं आणि त्याने ते आनंदाने मान्य सुद्धा केलं.त्यादिवसापासून त्याने तोडकी मोडकी मराठी बोलायला सुरुवात पण केली. आधी मला भाई म्हणून हाक मारायचा आता भाऊ म्हणून हाक मारतो.
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभराट व्हावी म्हणून प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. मराठी माणसाने स्वतःच बाजारमूल्य लवकरात लवकर ओळखावे.कोणताही न्यूनगंड न बाळगता सुईपासून ते सोनं खरेदी करताना मराठीतूनच व्यवहार करावे तरच आपली मायबोली वाढू शकते आणि होऊ घातलेल्या मराठी व्यासायिकांना पोषक वातावरण निर्माण होऊ शकत.
जय महाराष्ट्र, जय मराठी
#मराठीबोलाचळवळ
विशान केसरकर