मराठीच्या हिंदाळपणाला लिपी कारणीभूत आहे का? – भाषा लिपी आणि वास्तव

जागर महाराष्ट्र विशेष लेख 155
लिपी बदलणं हा भाषा टिकवण्याचा आदर्श मार्ग असू शकत नाही. जगात अनेक भाषा एकच लिपी वापरतात. मुळात आपली भाषा दुसऱ्या भाषेसारखी दिसत नसली म्हणजे तिचं संरक्षण होतं किंवा तिची शुद्धता राहते हा गैरसमज आहे. मराठी लोकं इतकं प्रचंड हिंदी पाहतात की मराठी बोलतानाही हिंदीसारखं बोलतात. आणि त्यातून मराठी लिहितानाही हिंदाळ लिहिलं जातं. उदाहरणार्थ मराठीत कधीही प्रचलित नसलेले शब्द आणि वाक्प्रचार आज लिखाणात येत आहेत. सुझाव देणे, घास खाणे, सफाई देणे, बढावा देणे, हा भरणे, चुप्पी साधणे, उजागर होणे, हावी होणे असले वाक्प्रचार मराठीत कधी होते? हे लिपी एक असल्याने होत नाही हा चोवीस तास हिंदी पाहण्याचा महिमा आहे! बरं, हे असले वाक्प्रचार लिहिता वाचता न येणाऱ्या लोकांच्याही तोंडी जाऊन बसलेत. त्यामुळं इथं लिपीला दोष देण्यात काही अर्थ नाही. अनपढ, गवार, मिलीभगत, ठेहराव, विरासत, पथराव, समधी, जीजू असले शब्द मराठीत आले कसे? याचं एकमेव कारण सातत्याने हिंदी वाहिन्या आणि कार्यक्रम पाहणे हेच आहे. हिंदी आणि मराठी साधारण एकाच जातकुळीतल्या भाषा असल्याने मराठीवर हिंदीचं आक्रमण होणं अतिशय सोपं आहे आणि ते ओळखू येणंही अवघड आहे.
https://qph.fs.quoracdn.net/main-qimg-118cb78c4bd20f6a56e48d795fe327f6
हात ऐवजी हाथ असं लिहिणं, धोका न लिहिता धोखा, भीक ऐवजी भीख, गडऐवजी गढ ही अशी मराठी शब्दांची हिंदीकरणं एक लिपी असल्यामुळे होत नाहीत. यासाठीही आपलं सतत हिंदी ऐकणं, हिंदी बोलणं आणि हिंदी पाहणं कारणीभूत आहे. आपण तर आजकाल मराठी लिहितानाही हिंदी वळणाचं लिहितो. ‘पुण्यात’ असं न लिहिता ‘पुणे मध्ये’, ‘स्वयंपाक करणे’ (रांधणे हे मूळ क्रियापद तर विस्मृतीतच गेलं आहे.) अशी वाक्यरचना न वापरता ‘जेवण बनवणे’ असं हिंदी वळणाचं मराठी आजकाल सर्रास लिहिलेलं दिसतं. हे जर थांबवलं नाही तर असा पायंडाच पडेल. मराठी ही व्याकरणदृष्ट्या हिंदीच्या जवळ आली तर ती हिंदीची एक बोलीभाषा म्हणून गणली जायलाही फार वेळ लागणार नाही. हे सर्व चिंतास्पद असंच आहे. जुन्या काळात लिहिल्या जाणाऱ्या मराठीत अश्या चुका होत नसत. कारण उघड आहे, तेव्हाच्या लोकांच्या सभोवती संपूर्ण मराठी वातावरण होतं आणि केवळ मराठीच बोलली जात असे.
आज महाराष्ट्रात अनेक संस्थांमध्ये तसेच दुकानांवर हिंदी पाट्या असतात, हिंदीत लिहिलेलं असतं. हे एक लिपी असल्यामुळे घडतं असं म्हणण्यापेक्षा हे आपण चालू देतो म्हणून घडतं. ज्या ठिकाणी लिपी वेगळी आहे त्याठिकाणी हिंदी भाषिकांकडून इंग्रजी वापरली जाते. स्थानिक भाषा डावलणं ही त्यांची जुनीच खोड आहे. मुळात महाराष्ट्रात हिंदी लिहिण्याला आपण विरोध करत नाही. तेच दुसऱ्या भाषेच्या लिपीत काही लिहिलं की ताबडतोब विरोध होतो. पण जेव्हा मुद्दा हिंदीवर येतो तेव्हा आपल्या न्यूनगंडातून आपण लिपी बदलण्याचा आश्रय घ्यायला जातो. कारण यातून आपली जबाबदारी टाळण्याची पळवाट काढता येते.
महाराष्ट्रातल्या गावांच्या, ठिकाणांच्या किंवा व्यक्तींच्या नावाचं भ्रष्टकरण केलं जातं. पुण्याला पुने, ठाण्याला थाना, यवतमाळाला यावतमाल, टिळकांना तिलक किंवा तेंडुलकरांना तेंदुलकर. किती उदाहरणं द्यावीत! याचं कारण एक लिपी म्हणायचं का आपलं दुर्लक्ष म्हणायचं? मराठी लोकांच्या लिहिण्यातही मराठी शब्दांची भरमसाट हिंदीकरणं झालेली दिसतात. उदा. सामसूमला ‘सुमसान’ लिहिलं जातं, चक्काचूर ऐवजी ‘चकनाचुर’ लिहिलं जातं, घमेंड न लिहिता ‘घमंड’ लिहिलं जातं. या सगळ्याचा दोष फक्त देवनागरी लिपीला द्यायचा का?
देवनागरी लिपी मराठीसाठी प्राचीन काळापासून वापरात आहे. काही अपवाद वगळले तर मराठी भाषेतील जुने शिलालेख आणि ताम्रपट सर्व नागरी लिपीतच आहेत. अगदी मराठ्यांच्या राजवटीतही साहित्य लेखनासाठी देवनागरी लिपीच वापरली जात होती. मोडी ही प्रामुख्याने राज्यकारभारांत आणि हिशेब ठेवण्यासाठीच वापरली जाई. मोडी लिपीत प्रामुख्याने दरबारी कामकाज चालत असे त्यामुळे कागदपत्रे सर्व मोडीत असत पण त्या काळात लिहिले गेलेले ग्रंथ प्रामुख्याने नागरी लिपीतच आहेत. त्यामुळे देवनागरी ही मराठीवर लादलेली लिपी आहे असा जर प्रचार होत असेल तर तो निखालस खोटा आहे. देवनागरी ही मराठीची मूळ आणि स्वाभाविक लिपी आहे. म्हणूनच आज जवळपास १५०० वर्षं लोटूनही ती व्यवहारात टिकून राहिली आहे. देवनागरी लिपी ही एका अर्थाने मराठीची ओळख आहे!
Related image
देवनागरी लिपी असल्यामुळे मराठी भाषेचा प्रचार होणं अतिशय सोपं आहे. शिवाय मराठी भाषा पसरवणं हेही अतिशय सोपं आहे. समाजमाध्यमांवर वावरतानाही मराठीत लिहिलेला मजकूर मराठी मातृभाषा नसलेल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचतो आणि मराठीत मांडलेल्या मुद्द्याची किंवा मताची इतरांकडून दखलही घेतली जाते हा अनेकदा येणारा अनुभव आहे. देवनागरी लिपी सोपी, सुटसुटीत, नियमबद्ध आणि बऱ्यापैकी परिपूर्ण आहे. देवनागरीतून अनेक उच्चार व्यवस्थितपणे लिहिता येऊ शकतात. देवनागरीची व्याप्तीही मोठी आहे. देवनागरी लिपी वापरत नसलेल्या अनेक भाषिकांनाही तिचा परिचय असतो. त्यामुळे देवनागरीतून लिहिलेलं मराठी बऱ्याच मोठ्या समूहापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. त्यासाठी इच्छाशक्ती हवी. देवनागरी सारखी मोठा आवाका आणि भरपूर प्रसार असणारी लिपी असूनही जर आपण अमराठी लोकांना मराठी शिकण्याची गोडी लावू शकलो नाही तर ती चूक आपली आहे, देवनागरी लिपीची नाही.
#मराठीबोलाचळवळ

© अथर्व पिंगळे

Related image

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

एका मराठी संवादाची गोष्ट!
कृपया पूढील संवाद लक्षपूर्वक वाचा👇 - हॅलो, भोसले सर बोलत आहात का? (हिंदीत सुरू) (इथं त्यांनी गृहीत धरलेय बरं का महाराष्ट्रात मराठी आडनावाच्...
होळीची माहिती - होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!
होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे! मराठी संस्कृतीत होळीच्या दिवशी होळी जाळण्याला महत्त्व आहे, त्याविषयी थोडी माहिती,   माघी पौ...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: