मराठी बोला चळवळीची ओळख

119

didyouknow

मराठी बोलणे, मराठी वाढवणे.

वर दाखवलेल्या चित्रात जरी सांख्यिकी असली तरी ती बाब खरी आहे, आपल्याकडे अवघा ३ लक्ष चौरस किमीचा हक्काचा भूभाग आहे जिथे आपण हक्काने मराठी बोलू शकतो. पण प्रत्यक्षात तसं घडतंय का? नाही ना? अनेक मराठीजन स्वतः परभाषेत बोलून इतरांची सोय करून देतायत आणि मराठीचं महत्व कमी करतायत. शासनही मराठीची गळचेपी करतंय आणि हि गोष्ट स्पष्ट आहे पण शासनाला नुसतं दोष देऊन काही होणार नाही. लोकशाहीत लोकांच्या मत महत्वाचे असते आणि जर बराच मोठा वर्ग जर एखाद्या गोष्टीची मागणी करत असेल तर शासनाला नमतं घ्यावं लागतं. पण आपल्याला तेवढं करायची गरज नाही. आपल्याला फक्त मराठीत बोलायचंय कोणीही समोर असूदेत फक्त मराठीत बोलायचं.
महाराष्ट्रात आताच नाही गेली सहस्त्र वर्षे स्थलांतर होतंय. भारताच्या अनेक भागातून लोकं इथे आली आणि इथल्या मातीशी एकरूप झाली. ती का झाली? याचं सर्वात मोठं कारण होत भाषा. कारण तेव्हाच्या लोकांनी मराठी भाषा सोडली नाही. त्यामुळे इथे बाहेरून आलेल्या लोकांना मराठी शिकणं भाग पडलं. आपण म्हणाल कि आताच्या युगात या गोष्टीचं काय महत्व? तर महत्व आहे. भाषेचं महत्व नसतं तर अनेक देशांनी स्थलांतरित होणाऱ्यांना त्या प्रदेशातील भाषेतून परीक्षेची सक्ती केली नसती. त्यामुळे आपण मराठीचा आग्रह धरुन संकुचित वृत्ती दाखवतोय हे मनातून काढून टाका, आणि महाराष्ट्रात बिनधास्त मराठी बोला. हीच आहे मराठी बोला चळवळ. कुठलेही मोर्चे नाहीत, शक्तिप्रदर्शन नाही. केवळ मराठी बोलायचं आणि आपल्या मित्र आणि आप्तेष्टांनाही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी भीड झटकून मराठीत बोलायला सांगायचं.


ध्येय- मराठी हीच महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची भाषा आहे, तिला तिचे न्याय्य अधिकार मिळवून देणे आणि त्यायोगे मराठी पुढे नेणे

 • जगातली कोणतीही भाषा बोलली गेली तरच पुढे जाते, तिचा विकास होतो, मराठी सुद्धा बोलली गेली तरच ती पुढे जाईल, पण असं होतांना दिसत नाही, बऱ्याच मराठी भाषिकांना मराठीतून बोलायला लाज वाटते, त्यावर उपाय काय ?
 • काहींना मराठीचा आग्रह धरण्यात कमीपणा वाटतो, कारण ते माय मराठीला कमी लेखतात. त्यांच्या मनात मराठी भाषेविषयी असलेला हा न्यूनगंड कसा काढून टाकता येईल?
 • मराठी ही राष्ट्रप्रेमासाठी अपात्र असल्याचा गैरसमज बरेच जण बाळगतात, त्यामुळे ते स्वतःच स्वतःच्या मातृभाषेला दुय्यम स्थान देतात आणि त्याचा अभिमानही बाळगतात.
 • ह्यावर एकमेव उपाय म्हणजे महाराष्ट्रात मराठीच बोलणे.
 • सगळ्यांनी आपले मतभेद बाजूला ठेऊन मराठीच्या जतन संवर्धनासाठी एकजूट व्हावे हाच एकमेव उद्देश जाणून सुमारे तीन वर्षांपूर्वी चळवळीची सुरुवात झाली, धनराज पवार ह्यांनी सुचवल्याप्रमाणे मराठी बोला चळवळ हे नाव घेत मोजक्या कार्यकर्त्यांसह चळवळीची सुरुवात झाली, आज चळवळीत महाराष्ट्रभरातून शेकडो लोक रीतसर नोंदणीकृत आहेत.

 

ध्येयधोरणे

 • एक ग्राहक म्हणून आपली भाषा वापरली जाणे हा आपला मूलभूत ग्राहक अधिकार आहे हा संदेश लोकांपर्यंत नेणे.
 • मराठीतून न बोलणारी कार्यालये, दुकाने, कंपन्या, मदतकेंद्रे (कॉल् सेंटर्) इत्यादी सर्व ठिकाणी महाराष्ट्रात मराठी हे धोरण राबवावे ह्यासाठी आग्रह धरणे.
 • वेळोवेळी मराठीचा आग्रह धरत मराठी हि हिंदी, इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे दाखवून देणे.
 • मराठीला संघराज्य पातळीवर हिंदीच्या बरोबरीचा कार्यालयीन भाषेचा दर्जा मिळवून देणे हे चळवळीचं दूरगामी उद्दिष्ट.
 • चळवळ हि पूर्णपणे नागरिकांची चळवळ आहे, हिचा संबंध कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय धोरणाशी नाही.
  इतर कोणत्याही भाषेशी आपलं भांडण नाही, पण महाराष्ट्रात मराठी हीच सर्वात महत्त्वाची भाषा आहे, मराठी हीच पहिल्या क्रमांकावर राहिली पाहिजे हा आग्रह आहे.
 • मराठी शाळांचं आणि मराठीतून शिक्षणाचं महत्व लोकांना जाणवून देणे आणि शिक्षणात मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही राहणे.

 

काही ठळक उपक्रम:

 • वेळोवेळी राबवलेल्या सामूहिक ट्विट् मोहिमा- ज्यातून मराठी हि बरोबरीची भारतीय भाषा आहे हे दाखवून देण्यात आलेलं आहे.
 • शासकीय कार्यालयांनी मराठी न वापरल्यास रीतसर तक्रारी, बहुतांश प्रकरणात बदल दिसून आले, बऱ्याच प्रकरणांत पाठपुरावा सुरु आहे.
  उदा. मुख्यमंत्र्यांची फेसबुक्-ट्विटर् खाती मराठी वापरत नव्हती, त्यांना त्याची जाणीव करून दिली, काही प्रमाणात फरक दिसून आला.
 • रेल्वे ह्या हिंदी इंग्रजी वापरणाऱ्या शासकीय संस्थेकडे विशेष लक्ष देऊन मराठी साठी पाठपुरावा.
  उदा. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस गाड्यांच्या पाट्या मराठीत नव्हत्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत त्या मराठीत आणल्या, बोरिवली स्थानकावर फक्त हिंदी फलक लावलेले होते, चळवळीने ते बदलून मराठीत करायला लावले.
 • व्यवहारात मराठीच वापरावी ह्यासाठी प्रयत्न.
 • खासगी कंपन्यांनी मराठी सेवा पुरवाव्यात म्हणून वेळोवेळी मागण्या, बहुतांश खासगी कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद
  उदा. शेव्हरोलेट्, विको उद्योगसमूह, जयहिंद कलेक्शन् इत्यादी.
 • मराठी भाषा दिन विविध उपक्रमांसह साजरा करणे.
 • वाचनाची गोडी आणि भाषाप्रेमी वाढवण्यासाठी वाचन कट्ट्यासारखे उपक्रम घेणे.
 • वरील सर्व  उपक्रमांचा वेळोवेळी आढावा घेणे आणि पाठपुरावा करणे.

मराठी बोला चळवळीचं चिन्ह

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने