इंग्रजी माध्यमाच्या शाळा हिरावून घेतायत मुलांचं बालपण?
काल परवाची गोष्ट आहे.
आदल्या दिवशीच्या जागरणामुळे उठायला थोडासा उशीर झाला. रोजची कामे आटपुन मी बाजारात गेलो तो पर्यत दुपार झाली होती. बाजारपेठ बंद, मला कंटाळा आला होता म्हणून महेश जैन यांच्या दुकाना शेजारील कडप्प्यावर बसलो होतो.
तितक्यात माझ्या मित्राचा मुलगा आला. “काय रे कुठे चाललास?,” तो म्हणाला,” खेळायला”.”
“पण कुठे? आणि कोणता खेळ?”
” अरे काका स्टोन पेपर सिझर रे”. (मी मनात विचार करतोय हा कोणता खेळ?)
त्याला जवळ बोलावले,मी ही खोडसाळ आणि तोही !,गट्टी लगेच जमली.😁
मी त्याला सांगितले,”आपण वेगळा खेळ खेळू”, तो “हा चल, पण खेळ कोणता रे ?”
“गोट्या माहित आहेत का?”,
तो “हो पण खेळता नाही येत.”
“चल मी शिकवतो”, राजा राणी, १०-२०, उटिस, सगळं शिकवल, पोरगं लय खुश झालं.
“काका, अजुन सांग ना नविन गेम्स….”
मी त्याला भवरे,विटी दांडू, लगोरी, खिपची,कांदाचिरी,डोंगर का पाणी, मामाचे पत्र हरवल…. खेळ सांगितले.त्याने कधीही हि नावे ऐकलेली नव्हती. एक-दोन खेळांची प्रात्याक्षिके दाखवली.
तो म्हणाला,” काका, इतके खेळ कधी खेळायचात? मी सांगितले, “शाळेत असताना आम्ही असेच खेळ रोज खेळायचो…”
(मधेच त्याची प्रश्नार्थक भावमुद्रा )”पण मम्मी-पप्पा खेळायला द्यायचे का?” मी हसत म्हटले,” हो, फक्त कधितरी अधीमधी ओरडायचे…”
“अरे यार!जरा घराबाहेर आलो कि लगेच होमवर्क आहे, कंपलिट कर, हा प्रोजेक्ट इनकंप्लिट आहे.ती असाईनमेंट राहिली, नुसता अभ्यास रे”,
मी पुन्हा हसलो, “अभ्यास तर करावा लागतोच.”
इतक्यात तोच म्हणाला,” काका तु अभ्यास केलेला कि नाही”,
मी,” हो केलेला”.
“बघ तु सगळे खेळ खेळायचा, मग अभ्यास कधी करायचा?
इकडे आम्हाला खेळायलाच मिळत नाही.सकाळी उठले की मम्मी पप्पा लगेच ओरडायला सुरवात, चल स्कुल व्हँन येईल तुझी तयारी नाही झाली, लवकर कर.”.
मी त्याला विचारले,” शाळेत कोणते खेळ खेळतात रे तुम्ही?.”
पुन्हा तो,” सांगितल ना स्टोन पेपर सिझर.”
“अरे हो की, तु म्हणाला होतास विसरलोच की मी, ते सोड रे मैदानात कोणते खेळ खेळतात रे?”
तो,” मैदान म्हणजे काय रे,काका?”
मी,”अरे ते ‘प्ले ग्राऊंड” ,
तो “ग्राउंड वर कोण नाही खेळत, तीथे स्कुल व्हॅन उभ्या असतात.”
मी त्याला चिडवायला म्हटले “आम्ही तर शाळेच्या मैदानावर कबड्डी,खो-खो,क्रिकेट खेळायचो. धावणे उंच- उडी,लांब- उडी,भालाफेक,थाळीफेक,लंगडी,तीनपायाची शर्यत वगैरे खेळायचो.”
तेवढ्यात ते पोरगं केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघत विचारतं, “काका, तुझी शाळा कोणती?”
मी- “आदर्श विद्यामंदिर केळवे”, तुझ्या बाबांची पण हिच शाळा बर का.”
“तु कोणत्या शाळेत जातोस?” (मला शाळेच नाव माहित होत तरी सुद्धा विचारले)
तो-“* स्टार इंग्लिश मिडियम स्कुल.”
“बाबा आणि तु ज्या शाळेत गेलास, ती मराठी शाळा होती ना, काका?”
मी- “हो”. तो- “मग मला का इंग्लिश मिडियमला टाकले?.”
खरच, मी सुद्धा या प्रश्नाचे उत्तर शोधतोय!
(इंग्रजी माध्यमांच्या हव्यासापोटी आपण मुलांचे बालपण तर हिरावून घेत तर नाही ना?असे नानाविध प्रश्न मनात संशयकल्लोळ निर्माण करताहेत, चुक कि बरोबर?माहित नाही, पण, इंग्रजी माध्यमांची मुले बालपणाला मुकत चालली आहेत, असंच काहीतरी चित्र जाणवतेय)
© प्रथमेश प्रभुतेंडोलकर