बेळगाव सीमाप्रश्न – कणा मोडलेला महाराष्ट्र…  

Uncategorized 46

पुन्हा १७ जानेवारीचा दिवस उजाडणार आणि पुन्हा सीमावासीयांची भळभळती जखम उघडी होणार. संयुक्त महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने पहिले रक्त सांडले गेले ते याच दिवशी. १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगावच्या किर्लोस्कर रस्त्यावर पैलवान मारुती बेन्नाळकर यांनी निधड्या छातीवर पोलिसांच्या गोळ्या झेलल्या. “मुंबई-बेळगाव –कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आज मराठी माणूस विचारतोय का हवे बेळगाव महाराष्ट्रात? एवढच नाही याच पाठोपाठ महादेव बारागडी , मधु बांदेकर ,लक्ष्मण गावडे आणि निपाणीच्या कमलाबाई मोहिते यांनी या लढ्याला पहिली आहुती दिली पण महाराष्ट्र विचारतोय का हवे बेळगाव? याच बेळगावच्या मातीमध्ये १९४६ साली संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिला जाहीर ठराव झाला. हजारो लोकांच्या उपस्थितीत आचार्य अत्रेनी ठराव मांडला संयुक्त महाराष्ट्राचा आणि आज लोक सीमावासियांना विचारतात का हवा महाराष्ट्र?
गेली सहा दशक फक्त राजकारण करत हा प्रश्न या न त्या कारणाने पुढे ढकलत नेताना महाराष्ट्राचा स्वाभिमान गहन पडला कि काय अशी शंका येते. स्वताच्या हक्काचा एक प्रश्न सोडविण्यासाठी अजूनही महाराष्ट्राकडे वज्रमुठ नाही. आज भलेही अनेक जण उठतील आणि पुरावे देतील कि महाराष्ट्राने काय काय केले पण आम्ही सांगतो आम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी रोज लढतो, रोज या लढ्यासाठी कुठल्या न कुठल्या आघाडीवर आपला योगदान देतो. एकाच वेळी केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या अन्यायाच्या विरोधात झगडतो. पण कुठे आहे महाराष्ट्र ? असे कोणते अनर्थ व्हायचे बाकी आहेत कि महाराष्ट्राला जाग येईल ? असे किती लोकांचे रक्त सांडणे गरजेचे वाटते तेव्हा महाराष्ट्राला या लढ्यासाठी पाझर फुटेल?
आज महाराष्ट्रात विचारल कुठे आहे बेळगाव? म्हणजे निर्लज्जपणे उत्तरे येतात कि बेळगाव कर्नाटकात आहे. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या मराठी लोकांना कि आम्ही महाराष्ट्राचेच होतो आणि आहे. कपटी राजकारणाचे बळी पडून कर्नाटकात अडकून पडलो . कोणतेही सबळ कारण नसताना फक्त मराठी माणसावरील द्वेषापाई लाखो लोकांना नरक यातना भोगण्यासाठी कर्नाटकच्या मगरमिठीत आम्हाला ढकललं गेला. ६४ वर्ष आम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि गुळगुळीत रस्ते आणि विकासाच्या नावाखाली महाराष्ट्र म्हणतो काय त्रास होतोय सीमावासियांना ? स्वतःच्या अस्मितेसाठी , स्वाभिमानासाठी आज जर महाराष्ट्र जागा होत नसेल तर कश्याला हवी मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ?? लाखो मराठी सीमावासीयांचे भाषिक श्राद्ध घालण्यासाठी कर्नाटक अहोरात्र प्रयत्न करत असताना महाराष्ट्र मात्र पक्षीय गुलामीत आणि सत्तेच्या खेळात अडकून आहे. मराठी माणसाच्या ढुंगणावर लाथ पडल्याशिवाय तो जागा होत नाही म्हणतात, मग सांगा अशी कोणती आगळीक होणे गरजेचे आहे कि महाराष्ट्र जागा होईल ?
आज गेली १५ वर्ष न्यायायालात खटला दाखल आहे आणि हे गोड निमित्त महाराष्ट्राला मिळाले हा प्रश्न बाजूला ठेवायला. कारण जो तो म्हणतो कि प्रश्न न्यायालयात आहे त्यावर जास्त बोलणे नाही. मग कुठे गेले शिवरायांचे संस्कार कुठे गेल्या त्या मावळ्यांच्या तलवारी स्वतःचा एक प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राकडे दिल्ली झुकविण्याची ताकद नाही. परवाच पानिपतच्या लढाईचा शौर्य दिवस साजरा केला लोकांनी पण असे दिवस साजरे करून का महाराष्ट्राची अस्मिता जिवंत राहणार आहे ? कारण जिथे खरी लढाई करण्याची गरज आहे तिथे महाराष्ट्र मात्र थंडगार झोपून आहे.
सीमाभागातील मराठी माणसाची आता शेवटची भाषिक अंतयात्रा निघायच्या तयारीत आहे. कर्नाटक सरकारने चारी बाजूने सीमावासियांना छळण्याचा सपाटा सुरू केला आहे सीमाभागातील दाही दिशात मिरवणारी मराठी भाषा आता घराच्या उंबऱ्यावर येऊन थाबली आहे.मराठी भाषेच्या मुळावर कर्नाटक सरकार उठले असताना कणा मोडलेला महाराष्ट्र उलट म्हणतो सीमावासीय काय करत आहेत ? का नाही लढत आहेत ? हा सीमावासियांचा प्रश्न नाही हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे पण महाराष्ट्र बोट दाखवतो तो सिमावासियांकडे. कर्नाटकातील राजकारणी , मठाधीश ,जनता, कलाकार, साहित्यिक, समाजसेवक, उद्योगपती सगळे एक बाजूने आता बेळगाव कायमचे घशात घालण्यासाठी प्रयत्न करत आहे महाराष्ट्र मात्र गाढ निद्रावस्थेत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वातंत्रासाठी लढण्याचा मंत्र दिला. स्वराज्य निर्मिती केली, त्या महाराष्ट्रात राहणारा आजचा मराठी माणूस मात्र आपल्याच आयुष्यात इतका गर्क झालाय कि सीमाभागातील होरपळणारा मराठी माणसाची व्यथा त्याला तुछ वाटते. गेली सहा दशके एकाच मुद्यावर सिमावासियांनी सर्व बाबतीत आपली न्याय बाजू सिद्ध केली .पण तरीही आम्हाला रोज अग्निपरीक्षा देण्यासाठी भाग पाडणारा महाराष्ट्र मात्र शांत आहे. मुंबई मिळाली म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्य थांबविण्यार्या महाराष्ट्रातील लोकांना स्वार्थी म्हणू नये तर काय म्हणावे ? का नाही महाराष्ट्राने अट्टहास धरला कि अखंड महाराष्ट्र मिळाल्या शिवाय मराठी माणूस स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील आमचे पाठीराखे काळाने गिळले. सेनापती बापट ,आचार्य अत्रे , एस.एम जोशी ,ए आर अंतुले, मधु दंडवते, बॅं.नाथ पै , अगदी अलीकडचे बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील असे अनेक लोक आम्हाला वाऱ्यावर सोडून गेले. लढा पोरका करून गेले . आजच्या पिढीतील राजकारणी, समाजसेवक, कलाकार यांना या लढ्याचे काही सोयरसुतक नाही मग आम्ही न्याय कुठे मागायचा ? आजच्या पिढीतील किती लोकांना हा लढा माहित आहे या लढ्याचे गांभीर्य माहित आहे महाराष्ट्रात ? मग सीमावासीयांनी कश्याच्या बळावर लढत राहायचा ?? एकच मागणी तर आहे बेळगाव ,कारवार , बिदर, भालकी व ८६५ खेड्यांसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा व आम्हा सीमावासियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव मिळावा. धगधगत्या अग्निकुंडात आजही हजारो सीमावासीय उड्या मारायला तयार आहेत व आपल्या प्राणाची आहुती देण्यास सज्ज आहेत पण महाराष्ट्राने एकदा उठाव करावा आणि या अंधकारातून सीमावासियांना महाराष्ट्रात सामील करून घ्यावे…अखेरचा उठाव हा यल्गार मराठी महाराष्ट्र देश एक करण्यास आता जाग मराठी.
जय महाराष्ट्र ..!!!!

– पियुष नंदकुमार हावळ , बेळगाव

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

डिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत!
डिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत! सर्वांसाठी एक आनंदाची बातमी! आता डिस्कव्हरी वाहिनी देखील मायबोली मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे!ऑगस्ट महिन्य...
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे!
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! काही लोक भाषेची व्याख्या ही भाषा म्हणजे केवळ एक संवादाचं माध्यम आहे अशी करतात. माझ्या मते ही व्याख...
मराठी भाषेच्या पराभवाची कारणे
मराठी भाषा माघारत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठी लोकांची 'दैनंदिन जीवनात स्वतःची भाषा सोडून इतर भाषांचा वापर करण्याची सवय!' आहे. या सवयीमुळे मर...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: